देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. महिला अत्याचाराच्या, बलात्काराच्या, विनयभंगाच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. महिला सुरक्षित नसल्याची देखील अनेक उदाहरणं पाहायला मिळत असतानाच दिल्लीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना एका कार चालकाने 10 ते 15 मीटरपर्यंत फरफटत नेलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली एम्सजवळ ही संतापजनक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्वाती मालीवाल (Swati Maliwal) दिल्लीतील महिला सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेत असतानाच हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार मालकाने त्यांची छेड काढली आणि त्यांना फरफटत नेलं. स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"काल रात्री उशिरा मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेत होती. मद्यधुंद अवस्थेत एका कार चालकाने माझी छेड काढली. जेव्हा मी त्याला पकडलं तेव्हा त्याने कारच्या खिडकीत माझा हात बंद करून मला फरफटत नेलं. मात्र देवाने जीव वाचवला. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील, तर परिस्थितीची कल्पना करा" असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"