नवी दिल्ली-
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) एक मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेबाबत विद्यापीठाकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. पण घटनास्थळावर तणावाचं वातावरण असून पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी जवळपास साडेसहा वाजता जेएनयूमधून पोलिसांना फोन आला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांचं एक पथक घटनास्थळावर पोहोचलं आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे.
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी माहिती मिळाली की जेएनयूच्या कॅम्पसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. माहिती मिळताच वसंत कुंज ठाण्याचे एसएचओ टीमसोबत जेएनयू कॅम्पसच्या जंगलात पोहोचले. पोलिसांनी पाहिलं तर एक मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह इतका कुजलेल्या अवस्थेत होता म्हणजेच मृतदेह बऱ्याच काळापासून या ठिकाणी होता. संबंधित व्यक्तीनं आत्महत्या केली की त्याची हत्या करुन झाडाला टांगण्यात आलं याचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्तीचं वय ४० ते ४५ वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे.
रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकलेली नव्हती. पोलिसांनी आता घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमला पाचारण करुन तपास सुरू केला आहे. यासोबत संबंधित मृतदेह विद्यापीठाच्या विद्यार्थी, फॅकल्टी किंवा बाहेरील कुणाचा तर नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत.
जेएनयू विद्यापीठ याआधीही विविध घटनांमुळे चर्चेत आलं आहे. अनेक निदर्शनं आणि हिंसक घटनांमुळे जेएनयूचं नाव नेहमी चर्चेत असतं. पण झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळण्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सर्वांना या घटनेनं चिंतेत टाकलं आहे. याबाबत विद्यापीठाच्या कुलुगुरुंनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांनी देखील सर्व चौकशी आणि तपासानंतरच सारंकाही स्पष्ट होईल अशी भूमिका घेतली आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.