मीरा रोड/कसारा - जळगाव जिल्ह्यातून मिरा भाईंदरच्या उत्तन येथे घरकामासाठी आणलेल्या ९ वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी बुधवारी केला. आरोपीने तिचा मृतदेह सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये पुरुन तो कसारानजीकच्या दरीत फेकला होता. तिचा कुजलेला मृतदेह पोलिसांनी बुधवारी बाहेर काढला.
उत्तन येथे राहणारा प्रकाश हरी राठोड हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. ९ वर्षीय मुलगी भारती चव्हाण ही औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याची रहिवासी असून तिची आई हिना चव्हाण हिच्या वडिलांचा आरोपी प्रकाश राठोड हा मावसभाऊ आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रकाश राठोड हा हिनाच्या घरी गेला होता. त्यावेळी भारतीला उत्तन येथील आपल्या घरी नेण्याचा प्रस्ताव त्याने तिच्या आईसमोर ठेवला. काही दिवस ती घरी राहील आणि तिची इच्छा असल्यास शिक्षणही घेईल, असे प्रकाशने हिनाला सांगितले होते. त्यानुसार हिनाने मुलीला प्रकाशकडे पाठवले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकाश आणि त्याची पत्नी अनिता यांनी भारतीला घरकामासाठी जुंपले होते. ते तिचा छळ करायचे. मध्यंतरी ते बाहेरगावी गेले असता, भारतीला घरात कोंडून गेले होते. यातून वाद वाढत गेले. साधारणत: १0 दिवसांपूर्वी वादातून प्रकाशने भारतीचा गळा दाबून तिचा जीव घेतला. तिचा मृत्यू झाल्याने प्रकाशने पत्नीचा भाचा आजू राठोड याच्या मदतीने भारतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न केले. त्यांनी पाण्याच्या ड्रममध्ये मृतदेह टाकून ड्रम सिमेंटने भरला. काही दिवस त्याने हा ड्रम घरातच ठेवला. त्यानंतर ५ डिसेंबरच्या दरम्यान तो दरीत फेकला.