नवी मुंबई : उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून दोघांनी एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी घडली होती. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी घटनेनंतर काही तासांतच दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री चंद्रकांत भोसले हे गंभीर जखमी अवस्थेत रबाळे पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी त्यांची अवस्था पाहून त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या गळ्यावर व इतर ठिकाणी वार केल्याच्या जखमा होत्या. उपचारानंतर भोसले यांनी पोलिसांना अमोल खरे व कल्पेश तांबे या दोघांनी हल्ला केल्याची माहिती दिली. हल्ला करणारे दोघेही रिक्षाचालक आहेत. खरेने भोसले यांच्या मध्यस्थीने राहुल घडसीकडून २६ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, दिलेली मुदत संपूनही तो उसने घेतलेले पैसे परत करत नव्हता. यामुळे भोसले यांनी त्याला उसने घेतलेले पैसे परत करण्यास सांगितले होते. याचा राग आल्याने खरे हा मित्र कल्पेश तांबेला सोबत घेऊन भोसले यांच्या घरी गेला. त्या ठिकाणी चर्चेसाठी भोसले यांना घराबाहेर बोलावून कटरने त्यांच्या गळ्यावर, तसेच इतर ठिकाणी वार केले. यावेळी त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करत, भोसले हे थेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे, पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप पाटील, अंकुश चिंतामण, दत्तात्रय ढुमे, पोलीस नाईक संतोष टिकेकर यांचे पथक करण्यात आले होते. त्यांनी हल्लेखोरांची माहिती मिळवून काही तासांतच त्यांच्या घरी धडक दिली. त्यामध्ये दोघेही पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या हाती लागले. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, २९ तारखेपर्यंत कोठडी मिळाली आहे.
उसने घेतलेले पैसे परत न केल्याने हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सोमवारी न्यायालयाने २९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली.