कल्याण-बैलांच्या शर्यतीवर बंदी असताना काही लोक नियम तोडून शर्यतीचे आयोजन करतात. आत्ता तर आगीवर बैल उडविण्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कल्याणमध्ये दोन ठिकाणाचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे.
कल्याण डोंबिवलीत आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात मोठया प्रमाणात बैलांची शर्यत आयोजित केली जात होती. सुप्रीम कोर्टाने या शर्यतीवर बंदी आणली. तरी देखील अनेक ठिकाणी नियम डावलून या शर्यती आयोजित केल्या जातात. कोरोना काळात सुद्धा या शर्यतीचे आयोजन करणा:यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. बैलांची शर्यती सुरु व्हावी यासाठी विविध संघटनांनी मागणी केली अहे. त्याला प्राणी मित्र संघटनांचा विरोध आहे.
या पाश्र्वभूमीवर कल्याणमध्ये दोन धक्कादायक घटनांचा व्हीडीओ समोर आला आहे. एका ठिकाणी गवत पेटवून तर दुसऱ्या ठिकाणी फटाके फोडून त्यावरुन बैल उडविले जात आहे. इतकेच नाही तर त्या आगीवरुन माणसेही उडय़ा मारताना दिसत आहेत. सोशल मिडियावर या व्हीडीओ व्हायरल झाल्यावर कल्याण वॉर रेस्क्यू फाऊंडेशनच्या कार्यकत्र्याने याची गंभीर दखल घेतली आहे. सुभाष पवार या प्राणी मित्रने अशा प्रकारच्या आयोजकांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक व्हीडीओ कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसराचा आहे. दुसरा व्हीडीओ कल्याण ग्रामीणमधील एका गावातील असल्याचा समोर आले आहे. टीव्ही नाईनने ही बातमी दाखविताच कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिस काय कारवाई करतात. याकडे लक्ष लागले आहे. परंपरेच्या नावाखाली जनावरे आणि माणसाचा जीव धोक्यात घालणारा स्टंटचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.