पुणे : पोटच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करून त्याची पनवलेमधील एका जोडप्यास एक लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी २४ तासांत हा प्रकार उघडकीस आणत मुलाची सुटका केली आहे. यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. मध्यस्थाने या मुलाला आणखी दुसऱ्या कुटुंबाला १ लाख ६० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक घडला.
प्रियंका गणेश पवार, जन्नत बशीर शेख, रेश्मा सुतार, तुकाराम निंबळे, चंद्रकला माळी, भानुदास माळी, दीपक तुकाराम म्हात्रे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशय येऊ नये म्हणून त्याच्या आईने मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार शुक्रवारी कोथरूड पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा प्रकार उघडकीस आला.
मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, विविध पोलीस ठाण्यांमधील ९ तपास पथकांमार्फत मुलाचा शोध घेण्यात येत होता. अपहृत मुलगा घटनेच्या दिवशी त्याच परिसरात राहणाऱ्या बांगडीवाली भाभीसोबत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. बांगडीवाली भाभी जन्नत शेख (रा. जळके वस्ती, कोथरूड) हिला ताब्यात घेऊन तपास करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला एका मुलास घेऊन जात असल्याने पोलिसांना दिसले. जन्नतकडे पुन्हा सखोल तपास केला असता तिने गुन्हा कबूल केला.
जन्नत हिने रेश्मा आणि प्रियंका यांच्याशी संगनमत करून मुलाला मध्यस्थ तुकाराम निंबळे (रा. मावळ) याच्यामार्फत चंद्रकला माळी आणि भानुदास माळी (रा. बोर्लेगाव, पनवेल) यांना १ लाख रुपयांना विकले.
पनवेल पोलिसांनी चंद्रभागा माळी व भानुदास माळी यांना ताब्यात घेतले. त्यांनी मुलास १ लाख ६० हजार रुपयांना दीपक तुकाराम म्हात्रे व सीताबाई दीपक म्हात्रे (रा. केळवणे, पनवेल) यांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी केळवणे येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले व आरोपींना अटक केली.