मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मृतदेहाची पाहणी न पाहताच खासगी डॉक्टरने अवघ्या पाचशे रुपयांत प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती दादर येथील येझदीयार एडलबेहराम (७७) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातून समोर आल्याचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. डॉक्टरच्या वैद्यकीय अहवालामुळे एडलबेहराम यांचे शवविच्छेदन झाले नसल्याने त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गूढ कायम राहिले. शिवाय मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दादर टीटी येथील घटालिया मेन्शनमध्ये एडलबेहराम एकटे राहण्यास होते. त्यांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या मंगल गायकवाडने तिचे दोन विवाह झाले असतानाही विधवा असल्याचे सांगून त्यांच्याशी लग्नाचा घाट घालत घराची मालकीण होण्याचे स्वप्न रंगवले होते. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी मंगल ही एडलबेहराम यांना घेऊन केईएम रुग्णालयात पोहोचली. तेथील डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित करून पुढील चौकशीसाठी मृतदेह केईएम रुग्णालयातील ड्यूटीवरील पोलीस अंमलदाराच्या ताब्यात दिला होता. तेथील पोलिसांनी याबाबत माटुंगा पोलिसांना कळवून चौकशी करण्यास सांगितले होते.
याच दरम्यान मंगलने काळाचौकी येथील खासगी डॉक्टर अनिल नांदोस्कर याच्याकडून नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवले. ते प्रमाणपत्र माटुंगा पोलिसांना दाखवून ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नाही. माटुंगा पोलिसांनी नांदोस्करकडे चौकशी करत त्याचा जबाब नोंदवला आहे. त्याने पाचशे रुपये घेऊन मृतदेह न पाहताच प्रमाणपत्र दिल्याचेही तपासात समोर आले आहे. डॉक्टरच्या चुकीच्या प्रमाणपत्रामुळे एडलबेहराम यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत नांदोस्कर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
उपचारात दिरंगाई झाली म्हणून एडलबेहराम यांचा मृत्यू झाला की, मंगलने त्यांची हत्या करत बनावट कागदपत्रांद्वारे मृतदेहाची व्हिल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मंगलच्या अटकेच्या दिशेने पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहेत. तिच्या चौकशीतून नेमके काय घडले, हे उघडकीस येणार आहे.
मंगला म्हणे, कोरोनामुळे मृत्यू
मंगलाने घराचा मालकी हक्क मिळवण्यासाठी येझदीयार एडलबेहराम यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र, केईएम रुग्णालयात त्यांना दाखलपूर्व मृत घोषित करताच, त्यावर कोरोनाची लक्षणे नाही, असेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे यामागचे गूढ अधिकच वाढले आहे.
गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई डॉक्टरने पाचशे रुपयांत मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचे दिसत आहे. यात सहभागी होणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल. मंगलला अटक केली नसून, लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. - विजय पाटील, पोलीस उपायुक्त