वर्धा - दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपीला अल्लीपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने सदर आरोपीची जामीन नाकारत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्या आरोपीची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली असून शंकर खुशाल चिंचोने, (३१) रा. कात्री असे मृतकाचे नाव आहे.
अल्लीपूर पोलिसांनी कात्री येथील शंकर खुशाल चिंचोने याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर शंकर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने आरोपी शंकर याचा जामिन फेटाळत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. न्यायालयीन कोठडी भोगत असताना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शंकरची प्रकृती अचानक बिघडली. ही बाब लक्षात येताच वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शंकरला सुरूवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे.
शंकर खुशाल चिंचोने याच्याविरुद्ध यापूर्वीही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. नुकतीच त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याच गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडी भोगत होता.- योगेश कामाले, ठाणेदार, अल्लीपूर