लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदर पश्चिमेच्या उत्तन तलाठी कार्यालयाजवळ एक मोठे झाड झोपडीवर पडून त्यात राहणाऱ्या इसमाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे शहरात झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. १३ सप्टेंबरला (मंगळवारी) सकाळी उत्तन तलाठी कार्यालय जवळ असलेल्या झोपडीवर चिंचेचे मोठे झाड पडले. त्यावेळी झोपडीत असलेले पांडुरंग काशिनाथ दिवा (५२) यांच्या अंगावर झाड पडल्याने मृत्यू झाला. त्यांची पत्नी नर्मदा सुद्धा झाडाखाली अडकली होती. महापालिकेच्या अग्निशमन दलास याची माहिती मिळताच एकनाथ पाटील, ऑस्टिन मुनीस, दिशांत पाटील, रिहान बळबले, सिद्धांत रणावरे, मेघनाथ म्हात्रे, शेल्डन ग्रेशियस, राजकुमार पाटील, यश भोईर आदी जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड बाजूला केले. पांडुरंग यांचा मृत्यू झाला होता, पण त्यांच्या पत्नीस वाचवण्यात यश आले.
पांडुरंग हे मूळचे पालघर जिल्ह्यातील वाडा येथील डोंगरपाडा गावात राहणारे होते. मजुरी कामासाठी ते उत्तन येथे रहात होते. या प्रकरणी उत्तन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.