- महेश सरनाईक
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : आडाळी एमआयडीसीत निर्जनस्थळी रस्त्यावर झोपलेल्या रोलर ऑपरेटरला भरधाव ट्रॅक्टरने चाकाखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. माणिक रोहिदास चव्हाण (२४ रा.आंबेतांडा ता.कन्नड जि. संभाजिनगर) असे त्याचे नाव असून ट्रॅक्टर चालक शेखर बोराडे याच्यावर दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान हा जरी वरकरणी अपघात वाटत असला तरी संशयास्पद अशा अनेक बाबी समोर आल्याने त्याच्या मृत्यूमागे घातपात तर नाही ना? यादृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी मृत माणिक चव्हाण हा आडाळी एमआयडीसी त रोलर ऑपरेटर म्हणून काम करायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्याजवळ कोणतेही काम नव्हते. त्यामुळे तो नवीन कामाच्या शोधात होता. तो काल रात्रौ ८.३० वा. च्या दरम्यान एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर एच पॉइंटजवळ झोपला होता. त्याचदरम्यान शेखर बोराडे आपल्या ताब्यातील भरधाव ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्याला झोपलेला माणिक दिसला नाही. परिणामी ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने तो चाकाखाली चिरडून मरण पावला. याबाबतची माहिती गावात समजताच गावकऱ्यांनी त्याला उपचारासाठी मोरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. तेथून पुढे सावंतवाडी त नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर करीत आहेत.
अनेक संशयास्पद बाबीसमोरआडाळी एमआयडीसीतील रोलर ऑपरेटर चा जरी वरकरणी अपघाती मृत्यू वाटत असला तरी ट्रॅक्टर चालकाने दिलेल्या जबानी नुसार अनेक संशयास्पद बाबीसमोर आल्या आहेत. घटनास्थळाचा भाग निर्जंन व चढणीचा होता त्यामुळे आपण वेगात होतो परिणामी झोपलेल्या माणिकचा अंदाज आपल्याला आला नाही आणि अपघात घडला असे जबानीत त्याने सांगितले. मात्र मुळात मृत माणिक निर्जनस्थळी का झोपला असेल ? आणि जर खरोखरच झोपला तर त्याला ट्रॅक्टरचा आवाज कसा काय ऐकू आला नाही ?आणि जर चढणीचा भाग होता तर ट्रॅक्टर भरधाव कसा असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे सध्या अनुत्तरित आहेत. त्यामुळे मृत माणिकचा मृत्यू अपघाती होता की त्यामागे घातपाताचे कारण आहे यदृष्टीनेही तपास होणे गरजेचे आहे.