अमरावती : एमपीडीएअन्वये कारागृहात स्थानबध्द करण्यात आलेल्या सैय्यद फैजान वल्द सैय्यद शफी उर्फ छोटा रिचार्ज (२२, रा. ताजनगर) याचा रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला. खून, खुनाचा प्रयत्न असे १३ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या छोटा रिचार्जविरूध्द नागपुरी गेट पोलिसांनी एमपीडीएचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार ३० मे रोजी त्याला एक वर्षांसाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले होते.
स्थानबध्दतेच्या अवघ्या पाचव्या दिवशी छोटा रिचार्जच्या मृत्युची माहिती व्हायरल होताच, त्याच्या कुटुंबियांसह शेकडो नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतली. त्यामुळे तेथे फ्रेजरपुरा पोलिसांसह क्युआरटी देखील तैनात करण्यात आली. फ्रेजरपुरा पोलीस व कारागृह प्रशासनानुसार, कारागृहात बंदिस्त असलेल्या छोटा रिचार्ज या बंद्याने रविवारी सकाळी ९ च्या सुमारास श्वास घेण्यात अडचण येत असल्याची तक्रार केली. त्यावेळी त्याला कारागृहातील डॉक्टरांनी तपासून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेत असताना सकाळी ११ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. छोटा रिचार्ज हा गांजा पिण्याच्या सवयीचा होता. मात्र, पाच दिवसांपासून तो गांजाविना कासाविस झाला होता. त्यातच रविवारी सकाळी त्याला श्वास देखील घेता येत नव्हता. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्युची नोंद घेतली आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला जाणार आहे. तेथे इनकॅमेरा त्याचे शवविच्छेदन होईल.