- अजित गोगटेमुंबई - नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे. आता आरोपींच्या अपिलांवर नव्याने सुनावणी होणार असून, त्याचा निर्णय होईपर्यंत त्यांना फाशी देण्यास स्थगिती दिली आहे.या निर्णयाने अंकुश शिंदे, राज्या शिंदे, अंबादास शिंदे, राजूू शिंदे, बापू शिंदे व सुऱ्या शिंदे यांचा फास तूर्त सैल झाला आहे. हा आदेश न्या. अरिजित पसायत व न्या. मुकुंदकम शर्मा यांच्या खंडपीठाने ३० एप्रिल २००९ रोजी दिला. याविरुद्धच्या फेरविचार याचिकाही फेटाळण्यात आल्या. पुढे एका प्रकरणात घटनापीठाने निकाल दिला की, या शिक्षेविरुद्ध फेरविचार याचिकांवर खुल्या कोर्टात सुनावणी घ्यावी. चेंबरमध्ये फेटाळलेल्या याचिकांमधील अशा आरोपींचीही खुली सुनावणी व्हावी.यानुसार आरोपींच्या फेरविचार याचिकांची सुनावणी न्या. कुरियन जोसेफ, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने घेऊन सर्व आरोपींना फाशीचा निकाल मागे घेतला.आधीच्या खंडपीठाकडून तीन आरोपींचा पसंतीचा वकील नेमून बाजू मांडण्याचा हक्क हिरावला गेला होता, हे लक्षात आल्याने चूक सुधारण्यात आली. आरोपींसाठी टी. हरीश कुमार, राहुल कौशिक व गीता कोविलन यांनी तर राज्य सरकारतर्फे निशांत कटनेश्वरकर, सुवर्णा, अनुप कंडराज व दीपा कुलकर्णी यांनी बाजू मांडली.नाशिक सत्र न्यायालयाने सर्वांना १२ जून २००६ रोजी फाशी ठोठावली. उच्च न्यायालयाने २२ मार्च २००७ रोजी अपिलात अंकुश, राज्या व राजू यांंची फाशी कायम केली व इतरांना जन्मठेप दिली. फाशी झालेल्यांनी अपिले केली व इतर तिघांनाही फाशी व्हावी यासाठी राज्य सरकारने अपिले केली.सरकारच्या अपिलांची नोटीस अंकुश, राज्या व राजू या आरोपींवर बजावली गेली. मात्र न्या. पसायत व न्या. शर्मा यांच्या खंडपीठाने दोन दिवस सुनावणी आधी घेतली. नोटीस काढूनही तिघांसाठी कोणीच हजर न राहिल्याने खंडपीठाने अन्य तिघांचे अॅड. सुशील करंजकर यांनाच त्यांच्या वतीनेही युक्तिवाद करण्यास सांगितले. सर्व अपिले संबंधित व तथ्येही सारखीच असल्याने फाशीचा निकाल तीन नव्हे, तर सर्व आरोपींसाठी आताच्या खंडपीठाने मागे घेतला आहे.घातला दरोडा; बलात्कार व हत्याही केलीबेलटगवाण (ता. नाशिक) शिवारातील रघुनाथ हगवणे यांची बाग त्र्यंबक सतोटे कसत होते. ते बागेतील घरात राहायचे. आरोपींनी ५ जून २००३ ला घरावर दरोडा टाकला. चीजवस्तू लुटण्याखेरीज त्यांनी त्र्यंबक, त्यांचे दोन मुलगे संदीप व श्रीकांत आणि पाहुणा भारत मोरे यांचे खून केले. त्यांनी त्र्यंबक यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून ठार मारले. दरोड्यात त्र्यंबक यांची पत्नी व एक मुलगाही जखमी झाले होते.
सहा आरोपींची फाशीची शिक्षा चक्क नऊ वर्षांनी घेतली मागे! सुप्रीम कोर्टाने चूक सुधारली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 6:16 AM