धनकवडी : मांगडेवाडी येथील क्रशर साईटवर एका कामगाराचा वाळु आणि मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. राजू बंदगीसाहब मतेसगोल, वय ३५ वर्षे असे मृत व्यकीचे नाव आहे.
कात्रज अग्निशामक केंद्रातील प्रमुख संजय रामटेके, म्हणाले, दगड क्रशरचे कामगाज सध्या बंद ठेवलेले आहे. मात्र इतर ठिकाणाहून क्रशर, माती व दगड घटनास्थळावर आणले जातात. त्यांचा साठा संबंधीत ठिकाणी करुन ठेवला जातो. येथून शहरातील विविध बांधकाम साईटवर त्याचा पुरवठा केला जातो. येथे क्रशर व मातीचे डपिंग केल्यामुळे छोटे छोटे ढिग तयार झाले आहेत. यातील मयत राजू हा ट्रक चालकांना ट्रक खाली करण्यासाठी मदत करत होता. तो पहाटे खडीच्या ट्रकमध्ये बसून तेथे आला होता.
दरम्यान ट्रक घटनास्थळी आल्यावर खडी उतरवण्यासाठीचा मागचा दरवाजा उघडून खडी सकट राजूही खाली सरकला. इतक्यात लोड असल्यामुळे ट्रकडी मागे सरकून उलटला. खडी व मातीचा ढीगारा तसेच ट्रकच्या खाली राजू सापडला. दरम्यान कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान तांडेल संजिवन ढवळे, साबीर शेख, वसंत भिलारे, किरण पाटील, तेजस भांडवलकर, रमेश भिलारे घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना ट्रकचे फक्त केबीन वरती दिसत होते, पुर्ण ट्रक खडी व मातीत गाडला गेला होता. ट्रक उचलण्यासाठी दोन क्रेन मागवण्यात आल्या. मात्र त्यांनाही ट्रक हलवता आला नाही. यानंतर मोठी शक्तीशाली क्रेन मागवून ट्रक बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी रेती व मातीचा ढीगारा उपसला असता, त्यामध्ये राजू बेशुध्दावस्थेत सापडला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी मृत घोषीत केले.