औरंगाबाद : कामावर निघालेल्या 23 वर्षीय हायवा चालकास रस्त्यामध्ये अडवून 4 ते 5 चोरट्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास जकात नाका परिसरात घडली. नितीन उर्फ बंडू भीमराव घुगे (वय 23 वर्ष,रा . टी. व्ही सेंटर, जाधववाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, नितीन घुगे टीव्ही सेंटर भागात किरायाने खोली घेउन राहत होता. तो शहरातील एका कंत्राटदारकडे हायवा ट्रक चालविण्याचा काम करत असे. गुरुवारी मध्यरात्री कंत्राटदाराने त्याला फोन करून हायवा मध्ये कचरा घेऊन जायचे आहे असे सांगून बोलावून घेतले .त्यानंतर 10 मिनिटात येतो असे भावाला सांगून तो घराबाहेर पडला. रात्रीचे 2 वाजून गेले तरी नितिन घरी का आला नाही म्हणून त्याच्या भावाने त्यास कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद होता. आज सकाळी कंत्राटदाराने बंडूचा अपघात झाल्याचे फोन करून कळविले अशी माहिती मृताचा भाऊ सचिन घुगे यांनी दिली.
मारहाणीमुळे झाला मृत्यू नितिन दुचाकीवरून कामाला जात असताना त्याला जकात नाका परिसरात 4 ते 5 चोरट्यानी अडवून बेदम मारहाण केली. आरडाओरड झाल्याने आरोपी गल्लीबोळातुन पळून गेले. त्यानंतर नितिनने ही घटना कंत्राटदाराला व मित्राला सांगितली . मारहाणीमुळे त्रास होत असल्याने मित्रांनी त्याला घाटी रुग्णालायत दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांना कंत्राटदार आणि मित्रांनी दिली .
गुन्हेशाखेकडून पाहणीबाडूच्या हत्येची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी पथकासह घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात धाव घेत मृत मृतदेहाची पाहणी केली मृता च्या हाताला पायाला व शरिरावर मारहाणीच्या जखमा स्पष्ट दिसत आहेत.
भावाने केला संशय व्यक्त...कंत्राटदार व मित्रांनि मला रात्रीच घटनेबाबत सांगायला हवे होते,बंडूच्या खिशातील पाकीट गायब आहे . चोरट्यांनी मारहाण करून लुटले असते तर मोबाईल कसा ठेवला असता. सकाळी मला अपघात झाल्याचा खोटं बोलण्यात आले - सचिन घुगे, मृताचा भाऊ