जळगाव : साकेगाव, ता.भुसावळ येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या नीलेश बळीराम सोनवणे या तरुणाचा मंगळवारी पहाटे गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. नीलेशवर हल्ला करणाऱ्या लोकांविरुध्द तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात घेतला. दरम्यान, सर्व नातेवाईकांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. गवळी यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
साकेगाव येथे १३ जून रोजी रात्री कोळी व पाटील गटात वाद होऊन एकमेकांवर कुऱ्हाड व इतर शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला होता. यात मयुर सारंगधर पाटील व महेश सारंगधर पाटील तर कोळी गटातील ईश्वर उर्फ राहूल संतोष कोळी, नीलेश बळीराम सोनवणे व राहूल संतोष कोळी आदी पाच जण जखमी झाले होते. परस्पर तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या ९ जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
दहा दिवस मृत्यूशी झुंजदोन्ही गटातील जखमीवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु असताना दहाव्या दिवशी अर्थात २२ रोजी पहाटे नीलेश सोनवणे याने अखेरचा श्वास घेतला. दहा दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी होता.