लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : वसईजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर २६ फेब्रुवारीला संध्याकाळी मुंबईतील व्यापाऱ्याला दराेडेखाेरांनी लुटून २५ लाखांच्या रकमेसह पळ काढल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी वालीव पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट नंबर ३ ने या गुन्ह्याचा उलगडा करून नऊ दरोडेखोरांना अटक केली आहे. डाेक्यावर कर्ज झाल्याने दाेन मित्रांनी या व्यापाऱ्याला लुटण्याचा कट रचल्याचा उलगडा झाला आहे. आरोपींकडून ६ ते ७ लाखांची रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे.व्यापारी अरिहंत पाबुवाल यांचे मित्र पार्थ जितेंद्र जानी (२६) आणि रब्बानी मेहबूब परेल (२८) या दोघांवर कर्ज असल्याने हा दरोड्याचा प्लान आखण्यात आला होता. या दोघांना वालीव येथून ताब्यात घेतल्यानंतर दोघांचे वागणे, बोलणे यात तफावत जाणवत असल्याने संशय आल्यावर दोघांची कसून चौकशी केल्यावर गुन्ह्याची कबुली देऊन सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी अजमेर येथून गिरीश वालेचा उर्फ मनोहरलाल पटेल (२७) आणि अब्दुल हमीद अहमद सय्यद (35) यांना मंगळवारी पकडून वसईत आणले. ठाणे येथील राहणारे इम्रान अहमद शेख (३८), स्मितेश सुभाष गवस (३७), सुरेश गुणाजी दळवी (३३), संतोष गोविंद मोरे (४४) आणि विनय संतोष सिंग (४१) यांना बुधवारी अटक करून या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. हे पाचही आरोपी आर्थिक संकट व कर्जामुळे अब्दुल हमीद अहमद सय्यद याच्या सांगण्यामुळे गुन्ह्यात सहभागी झाले. मुंबईच्या अंधेरी येथील सहार रोडवरील हयात रेजन्सीमध्ये राहणारे व्यापारी अरिहंत अमित पाबुवाल (२७) हे कोविड साथीच्या अनुषंगाने कोविड साहित्य खरेदी करण्यासाठी तीन ते चार दिवसांपासून आरोपी मनोहरलाल पटेल यांच्यासोबत मोबाइलवरून संपर्कात होते.
शुक्रवारी व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अजमेरवरून दोन, वालीव येथून दोन आणि ठाण्यावरून पाच अशा एकूण नऊ दरोडेखोरांना पकडले आहे. यांचे कोणी साथीदार आहेत का, याचाही शोध घेत तपास करत आहे. आरोपींना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी वसई न्यायालयाने सुनावली आहे.- प्रमोद बडाख, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३