ठाणे : कर्जबाजारी झाल्यामुळे उत्तरप्रदेशातील गंगा नदीत बुडाल्याचा बनाव करणाऱ्या जगदीश प्रसाद मिश्रा (४६, रा. गोरखपूर) याचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने भिवंडीतून मोठ्या कौशल्याने शोध घेतला. या पथकाचे मिश्रा कुटुंबीयांनी तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कौतुक केले आहे.
उत्तरप्रदेशातील गोरखपूरमधील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे जगदीशप्रसाद हे ९ मार्च २०२१ रोजी उत्तराखंड राज्यात धार्मिक विधीसाठी गेले होते. त्यानंतर ११ मार्च २०२१ रोजी त्यांच्याच मोबाईलवरुन एका अनोळखी व्यक्तीने ते गंगा नदीमध्ये बुडून मृत्यू पावल्याची माहिती त्यांची नातेवाईकांना दिली. त्याआधारे गोरखपूरमधील शाहपूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. मात्र, हरिद्वार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमरजित सिंग यांच्या माहितीनुसार जगदीशप्रसाद हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात २० वर्षांपूर्वी वास्तव्याला होते. त्यांचा त्याच परिसरात शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी ठाणे पोलिसांकडे केली होती. त्याचा फोटो आणि जुन्या बंद असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारावर नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक विक्रांत कांबळे यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नारपोलीतील न्यू ताडाळी गाव येथे राजू चौधरी यांच्या चाळीत १५ मार्च २०२१ पासून जगदीशप्रसाद मिश्रा हे भाड्याने वास्तव्यासाठी असल्याचे समजले. त्यानुसार या पत्त्यावर त्यांचा शोध घेतला असता, जगदीशप्रसाद हे तिथे आढळून आले. कर्जबाजारी झाल्यानेच सुटका होण्याच्या उद्देशाने आपण स्वत: गंगा नदीत बुडाल्याचा घरी खोटा फोन करून मृत्यूचा बनाव केल्याची त्यांनी कबुली दिली. ही माहिती ठाणे पोलिसांनी शाहपूरचे पोलीस उपनिरीक्षक अनुप तिवारी तसेच मिश्रा यांची मुलगी निष्ठा मिश्रा यांनाही देण्यात आली. आपल्या वडिलांचा शोध घेतल्याबद्दल या मुलीने ठाणे पोलिसांचे आभार मानले.