लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीएनआयटीजवळ रविवारी पहाटे घडलेल्या हत्याकांडातील मृताची ओळख पटली असून, पुराणिक थेरम छेदय्या (वय ३५, रा. कौशल्यानगर) त्याचे नाव आहे. दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर आरोपी मारोती गजानन वरठी (वय ४२) आणि पूरण किसन खाडे (वय ५६, रा. कौसल्यानगर, बाबुलखेडा) या दोघांनी त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.पुराणिक कचरा वेचून पोट भरायचा. त्याला वृद्ध आई आणि भाऊ असल्याचे समजते. कचरा वेचता वेचता तो कोणत्याही भागात पोहचायचा. शनिवारी रात्री तसेच झाले. तो व्हीएनआयटीजवळ पोहचला. तेथेच आरोपी वरठी आणि खाडे हे देखील होते. आरोपी वरठी आणि खाडे अट्टल दारूडे आहेत. व्यसन भागविण्यासाठी ते चोरीही करायचे. या दोघांनी शनिवारी रात्री अशाच प्रकारे एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली आणि भरपूर दारू प्यायले. टुन्न झाल्यानंतर व्हीएनआयटी कॉलेजजवळच्या कम्पाऊंडलगत ते गेले. तेथे पुराणिकसोबत त्यांचा वाद झाला. दारूच्या नशेत या दोघांनी चाकूचे घाव घालून त्याला ठार मारले अन् त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकून पळून गेले. रविवारी सकाळी वरठीची पत्नी त्याच्याजवळ आली. तिने त्याला २०० रुपये मागितले. त्याने तिला रात्री पैसे नसल्यामुळे आम्ही दोघांनी (वरठी आणि खाडे) एकाची हत्या केल्याचे सांगून तिला मृतदेहाजवळ नेले. मृतदेह पाहून वरठीची पत्नी घाबरली. ती पळतच काछीपुरा चौकात असलेल्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या कार्यालयात पोहचली. तिने वरठी आणि खाडेने एका तरुणाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दारूच्या नशेत टुन्न असलेले आरोपी वरठी आणि खाडे या दोघांना ताब्यात घेतले. मात्र, मृताची ओळख पटलेली नव्हती. अखेर सोमवारी सकाळी बजाजनगर पोलिसांनी मृताचा पत्ता मिळवला. पुराणिकच्या वृद्ध आईने शव बघून एकच हंबरडा फोडला. दरम्यान, आरोपी वरठी आणि खाडेला पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांची १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.
नागपूरच्या बजाजनगरात हत्याप्रकरणात मृताची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:18 AM
व्हीएनआयटीजवळ रविवारी पहाटे घडलेल्या हत्याकांडातील मृताची ओळख पटली असून, पुराणिक थेरम छेदय्या (वय ३५, रा. कौशल्यानगर) त्याचे नाव आहे.
ठळक मुद्देव्हीएनआयटीजवळ घडला थरार : आरोपींना तीन दिवसांचा पीसीआर