तिवसा (अमरावती) : तालुक्यातील मार्डी येथील एका नऊ वर्षीय चिमुरडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची विदारक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या दुर्दैवी घटनेने समाजमन हादरले. आजोबांनी कारला येथील गुढी पाडव्याच्या यात्रेला जाऊ न दिल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. राणी श्रीकृष्ण सुरजसे असे मृत चिमुकल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलीची आई तिच्या वडिलांसोबत राहत नाही. वडील, आजी-आजोबांसमवेत नऊ वर्षीय राणी मातीच्या पडक्या घरात राहत होती. मृत मुलीचे वडील मोलमजुरी करून गुजराण करतात. ती गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होती. तिला पाच वर्षांचा लहान भाऊ आहे. गुढी पाडव्याला नजीकच्या कारला येथे विठोबाची मोठी यात्रा भरते. या यात्रेत राणीला जायचे होते. तिने आजोबांकडे हट्ट धरला. पण, बिकट परिस्थितीला शरण जात त्यांनी नकार दिला. त्यामुळे तिने रागाच्या भरात पडक्या घरातील घडवंचीवर चढून दुपट्ट्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मृत मुलीचे काका गोरखनाथ महादेव सुरजुसे यांनी कुºहा पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दाखल केली. राणीने टोकाचे पाऊल उचलल्याने तिचे सर्व कुटुंब सैरभैर झाले आहे. पोलिसांनी शुक्रवारीच तिचे घर गाठून पंचनामा केला. शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तिवसाच्या नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनेचे अनेक कंगोरे तपासले. शासकीय पंच घेऊन पंचनामा केला. पण, ही आत्महत्याच असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. शनिवारी तिच्यावर मार्डी येथे शोकाकुल अवस्थेत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेबाबत गांभीर्याने सर्व गोष्टी पडताळून पाहिल्या. मृत मुलीच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. प्रथमदर्शनी तिने स्वत:च गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. चौकशी सुरू आहे. - सचिन जाधव, पोलीस निरीक्षक, कुºहा