ठळक मुद्दे बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास मृतावस्थेत आढळला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघड झाली.
वरूड (अमरावती) : स्थानिक आझाद चौक परिसरातील नालीतून ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळला. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी या घटनेबाबत चर्चेला पेव फुटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फूट ४ इंच उंचीचा, दाढी, मिशी वाढलेला सदर अनोळखी इसम आझाद चौक परिसरातील काझी यांच्या आरागिरणीजवळच्या नालीत बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास मृतावस्थेत आढळला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघड झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी, जमादार रुपराव कडू करीत आहेत.