पुणे : शिवसेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांचा खुन करुन फरार झालेला मुख्य सुत्रधार व बापू नायर टोळीचा सदस्य स्वप्नील ऊर्फ चॉकलेट सतीश मोडवे याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने कराडमधील पेठ नाका येथे पकडले.
दीपक मारटकर यांचा खुन केल्यानंतर मोडवे हा फरार झाला होता. तो सतत आपले राहते ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. तो सध्या इस्लामपूर, सांगली, कराड या भागात असल्याची माहिती पोलीस हवालदार अजय थोरात व अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार युनिट १ चे पथक तातडीने त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. पांढऱ्या रंगाच्या गाडीतून तो फिरत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पेठ नाका चौकात ही गाडी आली असताना पोलिसांनी ती अडवून मोडवे याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. पुढील तपासासाठी त्याला फरासखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
दीपक मारटकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कारवाई.. शिवसेनाचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्यावर वार करुन त्यांचा खून करणाऱ्या १० जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसात मोक्का अंतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे.
अश्विनी सोपान कांबळे, महेंद्र मदनलाल सराफ, निरंजन सागर म्हंकाळे, प्रशांत ऊर्फ सनी प्रकाश कोलते, राहुल श्रीनिवास रागीर, रोहित ऊर्फ बाळा कमलाकर कांबळे, रोहित दत्तात्रय क्षीरसागर, संदीप ऊर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते, लखन मनोहर ढावरे आणि चंद्रशेखर रामदास वाघेल अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.
दीपक मारटकर यांचा २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता बुधवार पेठेतील गवळी आळी येथे डोक्यावर, हातावर व तोंडावर वार करुन खून करण्यात आला होता. अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ यांनी राजकीय वैमनस्यातून हा खून घडवून आणल्याचा आरोप आहे. या आरोपी हे बापूर ऊर्फ प्रभाकर नायर व स्वप्नील ऊर्फ सतीश चॉकलेट मोडवे याच्या टोळीचे सदस्य असून ते टोळीसाठीच त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले.