धारणी (जि. अमरावती) : मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभाग चिखलदराअंतर्गत हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक (डीएफओ) विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री तीनच्या सुमारास धारणी पोलिसांनी शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. वनविभागातच नव्हे तर, सोशल मीडियावरही ‘जस्टिस फॉर दीपाली चव्हाण’ अशी मागणी बुुलंद झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांच्या भूमिकेविरोधातदेखील संताप व्यक्त होत आहे.दीपाली यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. दीपाली दोन वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेश मोहिते (३०, रा. मोरगाव, जि. अमरावती) हे चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहेत.
सुसाईड नोटमध्ये काय?दीपाली यांनी ज्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली, तेथे धारणी पोलिसांना सुसाईट नोट मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या नावे लिहिलेले हे तीन पानी पत्रात त्यांनी शिवकुमारकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सविस्तर लिहिले आहे. प्रशासकीय जाच, रात्री-बेरात्री संकुल, अकोट फाट्यावर बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, सहकाऱ्यांदेखत होणारी अश्लील शिवीगाळ, शिवकुमार यांनी जाणूनबुजून जंगल फिरविल्याने गर्भपात झाल्याचे म्हटले आहे. आत्महत्येला शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई कराल, हीच शेवटची इच्छा, असे नमूद आहे.
शवविच्छेदन अमरावतीला, मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीनपोलिसांना घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ संजय काळे, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पती राजेश मोहिते यांची तक्रार मध्यरात्रीच नोंदवून घेण्यात आली. त्यांनतर मृतदेह बंदोबस्तात अमरावती येथे नेऊन शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव या मोहिते यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
उपवनसंरक्षक शिवकुमार निलंबितउपवनसंरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी चिखलदरा येथील उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अपर प्रधान मुख्य संरक्षक एम. एस. रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी शुक्रवारी हा आदेश काढला.