नाशिक : हरिसाल मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (आरएफओ) यांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेले उपवनसंरक्षक संशयित विनोद शिवकुमार तसेच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस.रेड्डी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करत त्यांच्याविरुध्द खुन, विनयभंगासारखे गुन्हे वाढवावे आणि चव्हाण यांना जलद न्याय द्यावा, या मागणीचे निवदेन नाशिक जिल्ह्यातील विभागीय वनधिकारी, वनक्षेत्रपाल, वनपाल संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी व विशेष पोलीस महानिरिक्षक यांना देण्यात आले.
वनखात्यातील धाडसी महिला वनक्षेत्रपाल दिपाली चव्हाण यांनी काही दिवसांपुर्वी शासकीय क्वार्टरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शासकीय पिस्तुलने छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्याचे वन खाते आणि सरकारही हादरले. याप्रकरणी नाशिक वनविभागातदेखील संतापाची लाट पसरली असून वनखात्यातील वनधिकारी, सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनपाल दजार्च्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी एकत्र येत मंगळवारी (दि.३०) या घटनेचा निषेध नोंदिवला. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांची भेट घेत निवेदन दिले.
शिवकुमारसह रेड्डी यांनाही सहआरोपी करत अटक केली जावी तसेच आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करावी, चव्हाण यांना मरणोत्तर तरी लवकर न्याय मिळावा, यासाठी हा खटला जलद न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविला जावा, यासाठी उच्च दर्जाच्या सरकारी अभियोक्ताची नियुक्ती सरकारने करावी, तसेच शिवकुमार व रेड्डी यांची विभागीय चौकशी त्वरित सुरु करावी आणि याप्रकरणात दोषी आढळून येणाऱ्या सर्वांविरुध्द कारवाई करण्यात यावी आदि मागण्या निवदेनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर राजपात्रित वनाधिकारी संघटनेच्या कार्यकारी सदस्य विभागीय वनधिकारी कांचन पवार, स्वप्नील घुरे, उदय ढगे, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, गणेश रणदिवे तसेच वनक्षेत्रपाल संघटनेचे अमोल आडे, प्रशांत खैरनार, सीमा मुसळे, पुष्पा सातारकर, प्रवीण डमाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वनसंरक्षक कार्यालयात झळकविले फलक
गडकरी चौकातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात राजपात्रित वनधिकारी संघटना, वनक्षेत्रपाल, वनपाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आरएफओ दिपाली चव्हाण यांना न्याय द्या, जस्टीस फॉर दिपाली, शिवकुमार यास बडतर्फ करा असे घोषवाक्य लिहिलेले फलक दिपाली चव्हाण यांच्या छायाचित्रांसह झळकावून निदर्शने केली.
...तर काम बंद आंदोलनाचा इशारा
दिपाली चव्हाण यांना जलद न्याय न मिळाल्यास आणि रेड्डी व शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ न केल्यास नाशिक वनखात्यातील वनधिकारी, वनक्षेत्रपाल यांनी काम बंद आंदोलनाचा इशाराही निवेदनात दिला आहे.-