अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला कळविले आहे. राज्याच्या प्रधान मुख्य सचिवांशी बोलणे झाले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. वनविभागात अशाप्रकारच्या घटना घडणार नाही, याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) पी. साईप्रसाद यांनी शुक्रवारी येथे दिली.दीपाली यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साईप्रसाद यांनी त्वरेने अमरावती गाठले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वनपरिक्षेत्राधिकारी संघटना आणि दीपाली यांच्या नातेवाईकांची साईप्रसाद, नितीन काकोडकर यांनी भेट घेतली. आत्महत्येला शिवकुमारसह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी तितकेच जबाबदार असल्याची कैफियत मांडली. यावेळी बोलताना साईप्रसाद यांनी दीपाली यांची आत्महत्या वनविभागासाठी फार दुर्दैवी घटना असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी उपवनसंरक्षक पियूषा जगताप, चंद्रशेखरन बाला आदी उपस्थित होते.
या आत्महत्या प्रकरणानंतर वनविभागात महिला अधिकारी असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या स्तरावर दरमहा विशाखा समितीचा आढावा घेण्यात येईल, असे राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सांगितले.मोबाइल जप्त, सीडीआर काढणारदीपाली यांचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला. सुसाइड नोटमध्ये नमूद रेकार्डिंग, आरोपी विनोद शिवकुमार याचेसह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांशी झालेला संवाद व अन्य बाबींची खातरजमा करण्यात येणार आहे. मोबाइलचा सीडीआर, हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेणे हा चौकशीचा एक भाग असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. चौकशीसाठी आवश्यक असलेल्यांचे बयानदेखील नोंदविण्यात येणार आहेत.
खासदार राणा म्हणतात.. मी रेड्डींशी अनेकदा बोललेदीपाली यांनी सदर प्रकार आपल्याला सांगितला. विनोद शिवकुमार यांच्याशी त्यांच्या संवादाचे रेकार्डिंगदेखील मी ऐकली आहेत. त्यावर एम. एस. रेड्डी यांना दोन-तीनदा फोन लावले. चव्हाण यांची बदली करून द्या, अशी मागणीदेखील केली. मात्र, रेड्डी यांनी शिवकुमार यांचीच बाजू घेतल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिली. आमदार रवि राणा हेदेखील रेड्डी यांच्यासह तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचेशी बोलल्याचे त्या म्हणाल्या.