तनुश्री दत्ताविरोधात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 06:07 PM2020-03-12T18:07:20+5:302020-03-12T18:08:59+5:30
नाना पाटेकर यांची सामाजिक संस्था असलेल्या नाम फाऊंडेशनविरोधात आरोप करू नये अशी न्यायालयाने कानउघडणी केली आहे.
मुंबई - गेल्या वर्षी MeToo मोहिमेंतर्गत अभिनेते नाना पाटेवर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या तनुश्री दत्तालामुंबई उच्च न्यायालयाने समजावले आहे. नाना पाटेकर यांची सामाजिक संस्था असलेल्या नाम फाऊंडेशनविरोधात आरोप करू नये अशी न्यायालयाने कानउघडणी केली आहे. या संस्थेने तनुश्री दत्ताविरोधात तब्ब्ल २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. अलीकडेच तनुश्रीने पत्रकार परिषदांमध्ये नाम फाऊंडेशनविरोधातही टीका केली होती.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तनुश्रीची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात तिचे वकीलही उपस्थित नव्हते. यामुळे नाना पाटेकर यांच्या संस्थेला काहीसा दिलासा देत असताना न्यायमूर्तींनी तनुश्रीला या संस्थेची बदनामी होईल अशी वादग्रस्त विधाने करू नये असे निर्देश दिले आहेत. तनुश्रीने नाम फाऊंडेशनच्या प्रतिमेला बाधा पोहचेल अशी वक्तव्ये करू नये असं न्यायालयाने बजावलं आहे.
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले होते. नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने परदेशातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या घेतल्या. मात्र, हा सर्व पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढायचे की यांचे काम झाले. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरे देणार होते, त्याचे काय झाले?, असा सवालही यावेळी तनुश्री दत्ताने उपस्थित केला होता. ‘नाम’ ही संस्था नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी २०१५ साली सुरु केली होती. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ही संस्था काम करते आहे. जानेवारी २०२० मध्ये तनुश्रीने एक पत्रकार परिषद घेऊन या संस्थेवर आरोप केले होते. या आरोपांमुळे संस्थेची बरीच बदनामी झाल्याचे या संस्थेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.
नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू; तनुश्री दत्ताची जळजळीत टीका
मोगुलमध्ये काम करण्याच्या आमिर खानच्या निर्णयावर भडकली तनुश्री दत्ता, सुनावले खडे बोल