अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अनेक दिवस भायखळा तुरुंगात काढावे लागले होते. नंतर न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. यावेळी कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच तिची बँक खातेही गोठवण्यात आले होते.
सुशांतच्या मृत्यूच्यावेळी ड्रग्सच्या दिशेने तपास करण्यात आला होता. त्या तपासात रियाचाही सहभाग असण्याचा आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केला होता. एनसीबीच्या या आरोपानंतर कोर्टाने रियाचे बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता या सर्व प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे.
मोबाईल, लॅपटॉप सारखे सर्व गॅझेट्स तिला परत मिळावे, बँक खाती पूर्ववत करावीत यासाठी रियाने कोर्टाकडे एक याचिका दाखल केली होती. रियाने केलेल्या या मागणीबाबत आता विशेष न्यायालयाने निर्णय घेत एका वर्षानंतर रियाला तिचे बँक खात्यांमध्ये व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रियाला तिचे गॅझेटही परत देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
कोर्टाने रियाचे बँक खाते डीफ्रीज करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच तिचा लॅपटॉप आणि मोबाईलही परत करण्यात आला आहे. रिया चक्रवर्तीची याचिकेवर सुनावणीदरम्यान एनडीपीएस कोर्टाने एनसीबीला हे आदेश दिले आहेत. रियाचे बँक खाते हे 16/09/2020 पासून कोणतेही कारण नसताना गोठवले आहे. तिला तिच्या कर्मचार्यांना पगार देण्यासाठी आणि अनेक प्रकारच्या व्यवहारांसाठी बँक खात्यांची आवश्यकता भासते असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं.