नवी दिल्ली: एम्समध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख कोटी रुपये काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या पाचपैकी ३ लाख रुपये डॉक्टरांना परत मिळाले. या प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस उपायुक्त आणि सायबर क्राईमकडून करण्यात येत आहे. मोबाईल सिम बंद होणार असल्याची बतावणी करत अज्ञातांनी डॉक्टरांकडून ओटीपी घेतला आणि त्यांच्या खात्यातून ५ लाख रुपये काढले.
एम्सचे डॉक्टर चेतन कुमार यांच्या खात्यातून ४ लाख ९० हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील सव्वा तीन लाख रुपये डॉक्टरांच्या खात्यात परत आले. डॉक्टर चेतन यांना एक फोन कॉल आला होता. तुमचं सिम कार्ड ब्लॉक होणार असल्याचं त्यांना फोनवरून सांगण्यात आलं. सिम सुरू ठेवण्यासाठी तुमच्यावर फोनवर आलेला ओटीपी सांगा, असं समोरील व्यक्तीनं सांगितलं.
डॉक्टर चेतन यांनी ओटीपी सांगताच त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ९० हजार रुपये वजा झाले. यातील सव्वा तीन लाख रुपये चेतन यांच्या खात्यात पुन्हा जमा झाल्याची माहिती डीसीपी सायबर क्राईम अन्येश रॉय यांनी दिली. या प्रकरणी तक्रार दाखल होताच फसवणुकीसाठी वापरण्यात आलेलं पोर्टल, ऍप, बँकेला अलर्ट पाठवण्यात आला. त्यामुळे फसवणूक करून मिळवलेली रक्कम अज्ञातांना त्यांच्या बँक खात्यात वळवता आली नाही.