नवी दिल्ली - श्रद्धा हत्याकांड देशभरात गाजत असताना दिल्लीत आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. याठिकाणी पतीच्या हत्येच्या आरोपात महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. नशेच्या अवस्थेत दोन्ही आरोपींनी पतीचा गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. दोघंही लपूनछपून मृतदेहाचे तुकडे मैदानात फेकून देत होते. दिल्ली क्राईम ब्रांचनं या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
काय आहे प्रकरण?५ जून रोजी पोलिसांना रामलीला मैदानात काही शरीराचे अवयव सापडल्याची बातमी मिळाली. पुढील३-४ दिवस हे तुकडे मिळत होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. परंतु ओळख पटत नव्हती. प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले होते. तेव्हा पोलिसांनी मैदानाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चौकशीच्या आधारे मृतदेह अंजन नावाच्या व्यक्तीचा असल्याचा संशय आला. त्यानंतर अंजनचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तो ५-६ महिन्यापासून बेपत्ता असून त्याची तक्रारही पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचं समोर आले.
पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढवली तेव्हा अंजन दुसऱ्या पत्नीसोबत दिल्लीत राहत होता असं पुढे आले. पोलिसांनी पत्नी पूनम आणि मुलगा दीपकची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या तपासातून सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. बिहारमध्ये राहणाऱ्या पूनमचं वयाच्या १३ व्या वर्षी सुखदेवसोबत लग्न झाले होते. दोघांना एक मुलगाही होता. परंतु सुखदेव पूनमला सोडून दिल्लीला आला. पूनम दिल्लीला त्याचा शोध घेण्यासाठी आली पण सुखदेव सापडला नाही. परंतु तिची जवळीक कल्लूशी वाढली. दोघांनी लग्न केले. या दोघांना ३ मुले होते. त्यातील एक आरोपी मुलगा दीपक होता. २०१६ मध्ये कल्लूचा आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर पूनम अंजनसोबत राहू लागली. २०१७ मध्ये या दोघांनी लग्न केले. हे पूनमचं तिसरं लग्न होते. दुसरीकडे अंजनने बिहारमध्ये पहिलं लग्न केले होते. त्याला ८ मुलेही होती. परंतु ही गोष्ट अंजनने पूनमपासून लपवून ठेवली.
दोघांमध्ये व्हायचा वादपोलिसांच्या माहितीनुसार, अंजन काहीही काम करायचा नाही. तो पूनमवर अवलंबून असायचा. पूनमचे दागिने विकून त्याने बिहारला पैसे पाठवले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यादरम्यान दीपकचं लग्न झाले. दीपकच्या पत्नी आणि बहिणीवर अंजनची वाकडी नजर होती असा संशय पूनमला होता. त्यामुळे पूनम आणि दीपकने मिळून अंजनच्या हत्येचा कट रचला.
नशेत केली हत्या पूनम आणि दीपकने अंजनला पहिले घरी बोलावलं. त्याला नशेचं औषध दिले. त्यानंतर गळा कापून त्याची हत्या केली. इतकेच नाही तर दोघांनी रक्त गोठेपर्यंत वाट पाहिली. दुसऱ्यादिवशी रक्त स्वच्छ केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. पांडव नगर भागात रामलीला मैदानाजवळ दोघांनी मृतदेहाचे तुकडे फेकले. शरीराचे ८-१० तुकडे केले होते. विविध ठिकाणी ते फेकले. पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेत चौकशी सुरू केली. आता मृतदेहाचे तुकडे आणि अंजन दासच्या कुटुंबीयांची डीएनए चाचणी केली जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"