नवी दिल्ली : तरूणाईचा बाईकवर स्टंटबाजी करून रील बनवण्याचा जास्त ओघ असल्याच दिसून येत आहे. असाच एक प्रकार दिल्लीत समोर आला आहे. रील बनवण्यासाठी बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी पकडले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी पहाटे संसद मार्ग आणि दुतवा पथ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नवी दिल्ली परिसरात बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना पकडले आहे. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महाला म्हणाले, "पहाटे साडेतीन वाजता गस्ती पथकाला दुचाकीस्वारांचा एक ग्रुप वेगाने आणि बेपर्वाईने गाड्या चालवताना दिसला. त्यानंतर रात्रीच्या गस्तीदरम्यान इतर कर्मचाऱ्यांना सतर्क केले आणि दुचाकीस्वारांवर कारवाई करत २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या."
दरम्यान, पोलिसांनी या दुचाकीस्वारांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नवी दिल्ली परिसरातून २८ दुचाकीस्वारांना अटक करण्यात आली आहे, हे लोक हेल्मेटशिवाय धोकादायकपणे गाड्या चालवत होते. चौकशी केल्यानंतर दुचाकीस्वारांनी या भागात रील शूट करण्यासाठी असे केल्याचे सांगितले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.