देशाची राजधानी दिल्लीमध्येगुन्हेगारी एवढ्या खालच्या स्तराला पोहोचली आहे की लोक एखाद्याचा काटा काढायचा झाला की तो कसाही काढतात. याचे ताजे उदाहरण बेगमपूर भागात उघडकीस आले आहे. एका महिलेने पतीचा काटा दूर करण्यासाठी एक दोघांना नाही तर पाच वेगवेगळ्या सुपारी किलरना पैसे दिले. या किलरना नेमण्यासाठी या महिलेने तब्बल वीस लाख रुपये खर्च केले. आता ते पाच किलर आणि महिला व तिचा प्रियकर सारे तुरुगाची हवा खात आहेत.
दूध व्यापारी प्रदीप याची हत्या करण्यात आली. यासाठी त्याची पत्नी सीमानेच किलर नेमल्याचे समोर आले. त्याहून धक्कादायक म्हणजे तिने पाच जणांना वेगवेगळी सुपारी दिली होती. पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडल्याचा फोन आला. पोलिसांनी माहिती काढली तेव्हा त्याच्या पत्नीचे त्यांच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूशी गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे समजले.
या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. जेव्हा दूध व्यापाऱ्याची हत्या झाली तेव्हा सीमाचा प्रियकर गौरव घरी नव्हता. यामुळे पोलिसांनी त्याची कॉल डिटेल्स चेक केली आणि त्याला नोएडातून ताब्यात घेतले. दोघांनाही समोरासमोर बसवून पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्यांनी खरे सांगतिले. प्रदीपला त्यांच्या लफड्याबद्दल समजलेले, त्याने दोघांवर त्यांच्यातील संबंध संपविण्यासाठी दबाव आणला होता. यामुळे त्याचा काटा काढल्याचे पोलिसांना सांगितले.
या दोघांनी दूधवाल्या प्रदीपला हटविण्यासाठी पाच लोकांना सुपारी दिली होती. या पाचही जणांनी एकत्र येत या व्यापाऱ्याचा खून केला. पोलिसांनी यानंतर त्या पाचही सुपारी किलर्सना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यावेळी वापरण्यात आलेल्या दोन बाईक, २ सुरे आणि सहा मोबाईल फोनही ताब्यात घेतले आहेत.