नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीमध्ये बुधवारी रात्री बुरखा परिधान करून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धुमाकूळ घातला. मद्यपान करून रस्त्यावर आलेल्या या हल्लेखोरांनी वाटेत दिसेल त्याला भोसकण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेनंतर दिल्लीमध्ये भीतीचे वातावरण आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, चौकशीसाठी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी केलेल्या भोसकाभोसकीत करणवीर (48) आणि दिनेश (32) यांचा मृत्यू झाला. करणवीर हे रात्री जेवण आटोपून शतपावलीसाठी रस्त्यावर आले होते. त्यांना वाटेत दिनेश आणि एक सुरक्षा रक्षक त्यांना भेटले. हे तिघेही रस्त्याच्या शेजारी उभे राहून गप्पा मारत होते. याचवेळी तिथे बुरखा घातलेले दोन हल्लेखोर आले. त्यांनी तिथे असलेल्यांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मात्र तेथील लोक सावरण्यापूर्वीच काही जणांना गंभीर जखमी करून हे हल्लेखोर पसार झाले. जखमी झालेल्यांना घटनास्थळावर उपस्थित असलेल्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, करणवीर (48) आणि दिनेश (32) यांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले.
दिसेल त्याला भोसकले, दिल्लीच्या रस्त्यांवर बुरखाधारी हल्लेखोरांचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:12 PM