दिल्लीत ईडीच्या नावाने मोठी फसवणूक करण्यात आली आहे. बनावट ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने दिल्लीच्या एका पॉश भागात एका व्यावसायिकाच्या परिसरात छापा टाकून त्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यावसायिकाच्या वकिलाने वेळीच बँकेत पोहोचून हा मोठा कट उधळून लावला.
२२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या दिल्ली झोनल ऑफिसला माहिती मिळाली की, काही लोक ईडीचे अधिकारी म्हणून अशोका अव्हेन्यू, डीएलएफ फार्म्स, छतरपूर, दिल्ली येथे छापेमारी करत आहेत. असंही सांगण्यात आलं की बनावट ईडी अधिकारी व्यावसायिकाला बँकेत घेऊन गेले होते, जेणेकरून ते त्याच्या बँक खात्यातून ५ कोटी रुपये काढू शकतील. ईडीच्या छाप्याच्या नावाखाली हा सर्व प्रकार केला जात होता.
माहिती मिळताच ईडीचे पथक तात्काळ बँकेत पोहोचलं. याची माहिती परिसरातील पोलीस ठाण्यालाही देण्यात आली व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले, त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठलं. बँकेत पोहोचल्यावर ईडीची टीम आणि पोलिसांना कळलं की व्यावसायिकाचा वकील बँकेत पोहोचला होता आणि त्याने बनावट ईडी अधिकाऱ्यांची चौकशी केली आणि त्यांचे आयकार्ड मागितले.
यानंतर ईडीचे बनावट अधिकाऱ्यांनी पकडले जाण्याच्या भीतीने बँक मॅनेजरने बँकेचे गेट बंद करण्यापूर्वीच तेथून पळ काढला. व्यावसायिकाची चौकशी केली असता असं समोर आलं की, काल रात्री ७ लोक २ कारमधून घरी आले आणि त्यांनी ईडीचे अधिकारी म्हणून छापा टाकण्यास सुरुवात केली. काहींनी ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावले होते. तीन जण मास्कशिवाय बोलत होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.