नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत हिट अँड रनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येथील केजी मार्ग-टॉलस्टॉय मार्गाच्या सिग्लनवर कारमधून आलेल्या एका व्यक्तीने दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांना धडक दिली. टक्कर इतकी जोरदार होती की, दुचाकीवर बसलेला एक जण दूरवर जाऊन पडला, तर दुसरा मुलगा कारच्या छतावर पडला. धक्कादायक बाब म्हणजे कार चालकाने कार न थांबवता तशीच पळवली. 29-30 एप्रिल रोजी रात्री 12:55 वाजता हा अपघात झाला.
आरोपी 3 किलोमीटर वेगाने कार चालवत राहिला आणि त्यानंतर दिल्ली गेटजवळ छतावर पडलेल्या तरुणाला खाली फेकून पळ काढला. या घटनेत त्या जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे. घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी मोहम्मद बिलाल याने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. मोहम्मदने आपल्या स्कूटीने गाडीचा पाठलाग केला आणि हॉर्न वाजवून आरोपीला गाडी थांबवण्यास सांगितले.
दुचाकीस्वार दोघेही भाऊ होते. यामध्ये मोठा भाऊ दिपांशू वर्मा (30) याचा मृत्यू झाला, तर त्याच्या मावशीचा मुलगा मुकुल (20) याची प्रकृती चिंताजनक आहे. दीपांशु दागिन्यांचे दुकान चालवत असे आणि तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच, कंझापाला घटनेप्रमाणे या घटनेतदेखील हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंझापाला हिट अँड रन प्रकरणराजधानी दिल्लीत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री कंझावाला भागात एका कार अपघातात 20 वर्षीय अंजलीचा मृत्यू झाला होता. नवीन वर्षाची पार्टी आटोपून अंजली घरी परतत होती. ती स्कूटी चालवत होती. तेव्हा एका कारने तिला धडक दिली. धडकेनंतर अंजली गाडीच्या टायरमध्ये अडकली, मात्र कारमधील आरोपी तिला 12 किलोमीटरपर्यंत ओढत राहिले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. या अपघातात अंजलीचा वेदनादायक मृत्यू झाला होता.