नवी दिल्ली – दिल्लीच्या IGI एअरपोर्टसमोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये २६ वर्षीय युवतीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. २७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सर्व्हिस बॉय रुममध्ये गेला असता त्याने युवतीचा मृतदेह पाहिला त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाला हा प्रकार सांगितला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावरुन युवतीसोबत आलेला युवक तिथून फरार झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, युवती आणि तिचा बॉयफ्रेंड शिवम चौधरी दोघं हॉटेलच्या रुमनंबर २०३ मध्ये थांबले होते. २५ फेब्रुवारीपासून दोघंही हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. घटनास्थळी दारुची बॉटल आढळली. ही युवती बिहारच्या किसनगड परिसरातील आहे. ती घरात ५ भावंडांपैकी सगळ्यात लहान आहे. मृत युवतीच्या घरच्यांनी सांगितले की, मागील ४ वर्षापासून युवती गाझियाबाद येथील शिवम चौधरी नावाच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. युवतीच्या घरच्यांना ही बाब माहिती होती. अनेकदा घरात सांगून ती शिवमला भेटायला जायची.
२५ फेब्रुवारीला असचं घडलं. शिवमला भेटण्यासाठी युवती घराबाहेर पडली. युवतीने तिच्यासोबत ६२ हजार रुपये घेतले होते. १५ फेब्रुवारीपासून युवतीचा फोन बंद होता. ती शिवमसोबत असल्याने सुरक्षित असेल असं घरच्यांना वाटलं. परंतु यावेळी कुटुंबाचा अंदाच चुकला. २७ फेब्रुवारीला संध्याकाळी पोलिसांचा फोन येताच युवतीच्या घरच्यांना मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला.
या घटनेची माहिती मिळताच कुटुंब घटनास्थळी पोहचले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मृत युवतीच्या बहिणीने शिवमवर हत्येचा आरोप लावला आहे. युवती शिवमसोबत लग्न करणार असल्याचं सांगत होती. परंतु शिवम लग्नाची गोष्ट टाळत होता. त्यामुळेच तिची हत्या झाल्याचा संशय बहिणीनं व्यक्त केला आहे. युवकाने पैशाच्या लालसेपोटी ही हत्या केल्याचं कुटुंबीयांचे म्हणणं आहे. युवतीच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचं दिसून येत आहे. पोस्टमोर्टमसाठी मृतदेह हॉस्पिटलला पाठवला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम बनवल्या आहेत.
पोलिसांचे पथक अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. त्याशिवाय हॉटेलच्या स्टाफशी चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर हॉटेल सील करण्यात आले आहे. युवतीचा मृत्यू अखेर झाला कसा? या उलगडा करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. शिवमनेच युवतीची हत्या केली का? शिवम फरार का झालाय? त्याचा शोध घेण्याचा आणि हत्येचं रहस्य उघड करण्यासाठी पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत.