२६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराची परिस्थिती दिल्लीपोलिसांनी संयम ठेवून चांगल्या प्रकारे हाताळली, म्हणून दिल्ली पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी पोलीस दलाचे कौतुक केल. तसेच पुढे येणाऱ्या अनेक आव्हानांसमोर सतर्क राहण्यास त्यांनी आवाहन केले आहे. पत्राद्वारे दिल्ली पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलीस दलाची स्तुती केली आहे.
या पत्रात त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, पोलिसांनी संयम बाळगला असून यशस्वीपाने हिंसक परिस्थिती हाताळली. २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर देखील पोलिसांनी खूप मोठा संयम बाळगला. आमच्याकडे पोलीस बळाचा वापर करण्याचा पर्याय होता, मात्र आम्ही प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे उफाळलेली परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यात पोलिसांना शक्य झालं. या हिंसक ट्रॅक्टर रॅलीत ३९४ पोलीस जखमी झाले. त्यापैकी काही अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. मी स्वतः जखमी पोलिसांना रुग्णालयात भेटलो असल्याचे दिल्ली पोलीस आयुक्त श्श्रीवास्तव यांनी पत्रातून सांगितले. तसेच पुढे त्यांनी नमूद केले आहे की, येणाऱ्या काळात खूप मोठ्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे, म्हणून आपण सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे. आपण संयम आणि शिस्त ठेवायला हवी. सर्व जखमी पोलिसांना चांगले उपचार मिळत आहेत. त्यांच्या आरोग्याची आणि उपचाराकडे दिल्ली पोलिसांचं लक्ष असेल असे पत्रात म्हटले आहे.