लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘शहरी नक्षलवाद्यांनी’ रचलेला कथित कट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एल्गार परिषद खटल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी दिल्ली विद्यापीठातील एक प्राध्यापक हनी बाबू एम. टी. यांना अटक केली. एप्रिलमध्ये आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांच्या अटकेनंतर बाबू हे खटल्यात अटक केले गेलेले १२ वे आरोपी आहेत.
उत्तर प्रदेशात राहणाºया व दिल्ली विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात सहयोगी प्राध्यापक असलेल्या बाबू यांना ‘एनआयए’ने आठवडाभरापूर्वी चौकशीसाठी मुंबईत आणले होते. मंगळवारी त्यांना औपचारिक अटक झाली. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
नक्षलींच्या कारवायांना मदत, माओवादी विचारसरणीचा प्रसार, या आरोपांवरून बाबू यांना अटक झाली. आधी अटक केलेल्या आरोपींसह ते कटातील साथीदार आहेत, असा ‘एनआयए’चा दावा आहे. पुणे, शनिवारवाड्यासमोर ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांवरून हा खटला उभा राहिला. याच परिषदेतील प्रक्षोभक भाषणांनी दुसºया दिवशी भीमा-कोरेगाव येथे व नंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराचा भडका उडाला, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
वरवरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर कराएल्गार परिषद व कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ कवी वरवरा राव यांच्या प्रकृती संबंधी अहवाल व त्यांच्यावर करण्यात येणाºया उपचाराची माहिती सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने नानावटी रुग्णालयाला मंगळवारी दिले.न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच तीन दिवसांत राव यांच्या प्रकृतीचा अहवाल आणि त्यांच्यावर करण्यात येणाºया उपचाराची माहिती सादर करा, असे निर्देश न्या. रमेश धानुका यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नानावटी रुग्णालयाला दिले. न्यायालयात अहवाल सादर करण्यात आल्यानंतर अहवालाची प्रत राव यांच्या कुटुंबीयांना द्यायची की नाही, यावर निर्णय घेण्यात येईल. राव यांच्या कुटुंबीयांना राव यांना भेटण्याची किंवा त्यांना राव यांच्या तब्येतीची माहिती वेळोवेळी देण्यास राज्य सरकार व एनआयएची हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने वरील निर्देश दिले.