नवी दिल्ली – सोशल मीडियावर ट्रोलिंगने त्रस्त झालेल्या एका युवा कलाकराचा जीव धोक्यात असल्याची बातमी आहे. २२ वर्षीय रॅपर असलेला युवक सोशल मीडियाच्या ट्रोलने वैतागून बेपत्ता झालेला आहे. गायब होण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर यमुना नदीत उडी मारून आत्महत्या करणार असल्याची पोस्ट केली आहे. ज्या व्हिडीओनं सोशल मीडियात त्याला ट्रोल केलं जात होतं तो व्हिडीओ ६ वर्ष जुना आहे.
व्यवसायाने रॅपर असलेला २२ वर्षीय आदित्यने ६ वर्षापूर्वी मुंबईत त्याचा पहिला व्हिडिओ बनवला होता. हा रॅप हिंदू धर्माशी संबंधित होता. त्यानंतर हिंदू धर्मावर आपत्तीजनक रॅप असल्याचा त्याच्यावर आरोप झाला. या गोष्टीला ६ वर्ष झाली. परंतु अलीकडेच कोणीतरी आदित्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल केला. त्यानंतर आदित्यने सोशल मीडियात पुन्हा माफी मागितली. परंतु युजर्सकडून त्याला वारंवार ट्रोल करण्यात आलं. आदित्यला जीवे मारण्याची धमकीही मिळाली.
आदित्यच्या आईनं सांगितल्यानुसार, जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने आदित्यने त्याचा मोबाईलही बंद केला होता. त्याचदरम्यान ८-९ ब्रँडसोबत आदित्य काम करत होता त्यांनी त्याची साथ सोडली. १ जूनला आदित्यने इन्स्टाग्रामवर यमुना नदीत उडी मारण्याची पोस्टकरून घरातून बाहेर पडला होता. तेव्हापासून आदित्यचा कुठेही ठावठिकाणा लागत नाही. आदित्यचं कुटुंबही चिंतेत आहे. दिल्लीच्या महरौली पोलीस ठाण्यात आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर आदित्यची आई मुलाच्या येण्याची वाट पाहत आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतून अचानक रॅपर आदित्य तिवारी उर्फ एमसी कोडे(MC Kode) याचा सुगावा अद्यापही पोलिसांना लागला नाही. आदित्य तिवारीचा मोबाईल गेल्या २५ मे पासून बंद आहे. त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन नोएडा येथे सापडलं. त्यानंतर मोबाईल बंद आहे. आदित्य १६ वर्षाचा असताना त्याने मुंबईत रॅप केले होते. या रॅपमध्ये हिंदू धर्मावर टीप्पणी करण्यात आली होती. त्याचा विरोध झाल्यानंतर आदित्यने माफीही मागितली होती. ते प्रकरण तेव्हा शांत झाले. त्यानंतर आता ६ वर्षांनी पुन्हा आदित्यचा रॅप सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आदित्यचं ट्रोलिंग सुरू झालं आणि त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली तेव्हापासून तो गायब झाला आहे.