दिल्लीतील शाहदरा येथे दिवाळीमध्येच एक धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी एक कुटुंब त्यांच्या घराबाहेर दिवाळी साजरी करत असताना दोन जणांनी येऊन ४० वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या १६ वर्षीय पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. याच दरम्यान दहा वर्षांचा मुलगा यामध्ये जखमी झाला आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आकाश शर्मा उर्फ छोटू आणि त्यांचा पुतण्या ऋषभ शर्मा यांचा मृत्यू झाला. तर क्रिश शर्मा याला गोळी लागल्याने तो जखमी झाला. आकाश शर्मा हे शाहदरा येथील फर्श बाजार भागात त्यांच्या घराबाहेर दिवाळी साजरी करत होते. रात्री आठच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
रात्री ८.३० वाजता पीसीआर कॉल आल्यानंतर पोलिसांचं एक पथक शाहदरा येथे पाठवण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं की, आरोपींनी आकाश शर्मा यांच्यावर गोळी झाडण्यापूर्वी त्यांना भेटले, नमस्कार स्पर्श केला होता. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे ज्यात पिवळ्या कुर्त्यातील आकाश आणि ऋषभ रस्त्यावर फटाके फोडत असलेले पाहायला मिळत आहेत. दारात उभे राहून हे सर्व करत आहेत. याच दरम्यान एका स्कूटीवरून दोन जण येतात आणि स्कूटीवर बसलेल्या व्यक्तीने आकाश यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला.
स्कूटीवरून खाली उतरल्यावर दुसरा व्यक्ती उभा आहे. तो अचानक बंदूक काढून आकाश यांच्यावर गोळ्या झाडतो. क्रिशलाही दरवाजाच्या आतमध्ये असल्याने गोळी लागली आहे. फटाके फोडणाऱ्या ऋषभला काही समजण्याआधीच हल्ला करणारे स्कूटीवरून पळू लागले. जेव्हा ऋषभ त्यांच्या मागे धावतो तेव्हा ते त्यालाही गोळी मारतात आणि निघून जातात.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शर्मा आणि ऋषभ शर्मा यांना रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर क्रिश शर्मावर उपचार सुरू आहेत. वैमनस्यातून घडल्याचं पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.