दिल्लीतील मंदिरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी कारमधून आलेल्या चोरट्यांनी देवाचा मुकुट चोरून नेला. तसेच चोरट्यांनी दानपेटीही सोडली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील पॉश भागातील वसंत कुंज येथील आहे. इथे काही लोक गाडीने एका मंदिरासमोर थांबले. यानंतर त्यांनी मंदिरात प्रवेश करून मुकुट चोरला. यासोबतच दानपेटीवरही डल्ला मारला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावेळी चोरट्यांनी मंदिरातील पुजाऱ्याचे पैसे आणि पूजेसाठी ठेवलेले दहा किलो देशी तूप लंपास केले. ही घटना शनिवारी पहाटे घडली.
चोरट्यांनी आधी मंदिराचे कुलूप तोडले, त्यानंतर आत जाऊन चोरीची घटना घडली. याआधी येथे चोरीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी दिल्लीतील भोगल भागात असलेल्या शिवमंदिरात चोरट्यांनी मोठी चोरी केली होती. मंदिरातील देवाच्या मूर्तीवरील सर्व दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते. शिवलिंगावर ठेवलेली चांदीची छत्रीही चोरट्यांनी पळवून नेली होती. सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात आले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला होता.
दिल्ली पोलिसांनी मंदिरात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचीही तपासणी केली होती. मात्र, त्यावेळी मंदिरात बांधकाम सुरू असल्याने कॅमेऱ्यांचे वायरिंग बदलण्यात येत असल्याने मंदिराच्या आतील भागात बसवलेले कॅमेरे काम करत नव्हते. पोलिसांनी मंदिराभोवतीचे कॅमेरे तपासले होते. चोरट्यांनी मंदिरातील सात चांदीचे मुकुट, एक त्रिशूल आणि चांदीची छत नेल्याचं समितीने सांगितलं होतं. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी कटरने कुलूप तोडले होते, त्यानंतर त्यांनी आत प्रवेश केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.