नवी दिल्ली - बिहारमध्ये दारुबंदीचा कायदा लागू आहे. याचा अर्थ त्या राज्यात दारू विक्री होत नाही. परंतु बिहार आणि आसपासच्या राज्यांमधून बिहारमध्ये दारुचा पुरवठा केला जातो. दारुविक्रीवर बंदी असल्याने तस्करांची चांदी आहे. मनाला येईल तो दर लावून तस्कर दारुची बेकायदेशीर विक्री करतात. दारुच्या या काळाबाजारात प्रत्येकजण वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतो. देशाची राजधानी दिल्ली याठिकाणी असाच एक प्रकार समोर आला आहे.
याठिकाणी पोलिसांनी दारु तस्करांचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीहून खरेदी केलेली दारू बिहारमध्ये पुरवली जात होती. परंतु यावेळी तस्करांनी काढलेली युक्ती पाहून पोलीस हैराण झाले. आऊटर नॉर्थ जिल्हा पोलिसांच्या स्पेशल स्टाफला दारु तस्करीची माहिती मिळाली. पंजाब ब्रँडची दारू टेम्पोतून दिल्लीहून बिहारला नेली जात असल्याची खबर पोलिसांना लागली. पोलिसांनी एक्शन मोडवर येत शोध सुरू केला.
यावेळी पोलिसांना जनता फ्लॅट सेक्टर २५ च्या रोहिणी इथं एक टेम्पो संशयास्पद आढळला. पोलिसांनी त्याला रोखलं. त्यात रोशन आणि सर्वजित सिंह दोघं बसले होते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत चौकशीला सुरूवात केली. पोलिसांना टॅम्पोत ६ लाकडी दरवाजाशिवाय काही आढळले नाही. तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र खाकी वर्दीचा धाक दाखवताच ताब्यात असलेल्या आरोपींनी खरे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जे दृश्य पाहिले ते हैराण करणारं होते.
पोलिसांनी ज्याला लाकडी दरवाजा समजलं ते दारूच्या बाटल्यांचा खजिना होता. छन्नी आणि हातोडीच्या मदतीने पोलिसांनी ६ लाकडी दरवाजावरील प्लाय बाजूला केले. तेव्हा रॉयल ग्रीन ब्रँड व्हिस्कीच्या एकूण २११२ बॉटल्स सापडल्या. खूप काळापासून आम्ही बिहारमध्ये दारू विक्री करत असल्याचं तस्करांनी म्हटलं. या आरोपींमागे आणखी कुठली टोळी सक्रीय आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"