नवी दिल्ली – न्यू उस्मानपूर परिसरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कौटुंबिक कारणावरुन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत युवती ही २६ वर्षाची होती. मृत्यूपूर्वी युवतीनं तिच्या आईला फोन केला होता. परंतु हा मुलीसोबतचा अखेरचा फोन संवाद असेल याची भनकही आईला लागली नाही. रितुनं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचं आव्हान निर्माण झालं आहे.
रितूच्या आत्महत्येची बातमी मिळताच तिच्या कुटुंबातील लोक सासरी पोहचले. नातेवाईकांनी पोलिसांच्या समक्ष तिच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. मृतदेहाच्या जवळ सुसाईड नोटही सापडली नाही. त्यामुळे रितूचा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. रितूच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर तिची हत्या करुन मृतदेह लटकवला असल्याचा आरोप केला.
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतर तथ्याच्या आधारे कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, रितू कुटुंबासोबत ब्रह्मपुरी भागातील गल्ली नंबर १२ मध्ये राहत होती. डिसेंबर २०१७ मध्ये कर्मवीर नावाच्या युवकासोबत रितूचं लग्न झालं होतं. या दोघांना ३ वर्षाची मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा आहे. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास रितूनं घरात गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेची माहिती पतीने तिच्या माहेरच्यांना दिली.
बातमी कळताच माहेरची मंडळी सासरी पोहचली. त्यावेळी पोलीसही तिथे आले होते. पोलिसांनी माहेरच्या लोकांसमोर रितूचा पंख्याला लटकलेला मृतदेह खाली उतरवला. रितूची बहीण सोनिया म्हणाली की, जवळपास १० च्या सुमारास तिच्या बहिणीचा आईला कॉल आला होता. त्यावेळी आयुष्याला कंटाळली आहे असं ती म्हणाली होती. त्यानंतर रडत रडत रितूने फोन ठेवला. मग काही वेळातच रितूच्या नवऱ्याचा माहेरी फोन आला आणि रितूच्या निधनाची माहिती दिली. कर्मवीर आणि त्याचं कुटुंब रितूचा छळ करत होते. रितूला मारहाण व्हायची. त्यामुळे ती त्रस्त झाली होती असा आरोप रितूच्या कुटुंबीयांनी लावला. पोलीस नातेवाईकांची चौकशी करून या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत.