नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील छतरपूर एक्सटेंशन परिसरात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, याठिकाणी एका ३६ वर्षीय महिलेने तिच्या पतीची चाकूने वार करून हत्या केली त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकचं नाही तर या महिलेने पतीची हत्या केल्यानंतर या घटनेचा कबुलीजबाब फेसबुकवर पोस्ट करून अपलोड केला.
दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांच्या माहितीनुसार, रेणुका नावाची महिला मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी आहे, तर तिचा पती चिराग शर्मा(३७) हरियाणाच्या यमुनानगर भागात राहणारा आहे. दोघंही पती-पत्नी एका इन्सुरन्स कंपनीत कामाला होते, चिराग शर्मा सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होता तर रेणुका त्याच कंपनीत ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये कामाला होती, ८ वर्षापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना कोणतंही आपत्य नव्हतं, ते दोघं सध्या छतरपूर एक्सटेंशनच्या दुमजली इमारतीत वास्तव्यास होते.
दोघांमध्ये सुरू होता वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते आणि वारंवार वाद होत होता, शनिवारी रात्री दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं, यानंतर महिलेने पतीवर चाकूने वार करत हल्ला केला, यानंतर तिने स्वत:ची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, घरमालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात या दोघांनी घराचा दरवाजा उघडला नव्हता, त्याचवेळी पीसीआरला एका महिलेच्या फेसबुक पोस्टबाबत माहिती मिळाली, या फेसबुक पोस्टमध्ये तिने पतीची हत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं.
घटनास्थळी पोलीस पोहचली त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, त्यावेळी दोघं पती-पत्नी बेसुद्ध अवस्थेत आढळले, चिराग जमिनीवर पडला होता तर रेणुका बेडवर पडलेल्या अवस्थेत होती, जमिनीवर चारही बाजूने रक्ताचे डाग होते, या दोघांमध्ये खूप ताणतणाव असल्याचं पोलिसांना कळालं, या दोघांना पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी चिरागला मृत घोषित केले तर रेणुकावर अद्याप उपचार सुरू आहेत, महिलेची प्रकृती ठीक असून तिच्यावर लक्ष ठेवले जात आहे. महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तिचा जबाब घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितले. या घटनेमागील रहस्य शोधण्यासाठी पोलीस पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाची चौकशी करणार आहेत, त्याचसोबत शेजारी आणि घरमालकाचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. पुरावे मिळवण्यासाठी पोलीस दोघांचेही फेसबुक पेज तपासणार आहेत.