लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : अनुकंपा तत्त्वावरील नाेकरीसाठी युवतीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आराेपावरुन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर याच्याविराेधात विनयभंग तसेच ॲट्राॅसिटी कायद्यानुसार शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका मतिमंद शाळेत पीडित मुलीचे वडील नाेकरीला हाेते. त्यांचा २००७ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर सदर कर्मचाऱ्याच्या पत्नीने अनुकंपा नाेकरीची मागणी केली हाेती. मात्र, त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. त्यानंतर वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळावी, अशी मागणी तक्रारदार पीडित मुलीने केली. त्यासाठी प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली हाेती. सदर मुलगी या जागेसाठी पात्र हाेती, संस्थेकडे जागाही रिक्त हाेती. मात्र, नियुक्तीसाठी खमितकर हे सतत टाळटाळ करीत हाेते. मुलीची आर्थिक परिस्थिती हालाखीची हाेती. हे माहीत असतानाही खमितकर यांनी २२ जानेवारी राेजी सायंकाळी कार्यालयात बाेलावून शरीरसुखाची मागणी केली, असा आराेप तिने तक्रारीत केला आहे.