अमरावती : गाडगेनगर ठाण्यात दाखल बनावट दारूच्या गुन्ह्यात अटक करून आरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याबदल एसीबीच्या पथकाने गाडगेनगर ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एका खासगी इसमावर शनिवारी गुन्हा नोंदविला.
४ ऑगस्ट रोजी सदर प्रकरणाची पडताळणी करण्यात आली, तर ७ ऑगस्ट रोजी मोर्शी मार्गावरील व्हाईट कैसल हॉटेलसमोर आरोपी खासगी इसमाने लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पीएसआय गणेश अहिरे, खासगी इसम अशोक उर्फ पप्पू धनराज रावलानी (५१, रा. अमरावती) असे आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी ५१ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती.
तक्रारदारावर गाडगेनगर ठाण्यात दाखल बनावट दारूच्या गुन्ह्यात अटक करून आरोपी न करण्याकरिता पीएसआय अहिरे व खासगी ईसम पप्पु यांनी दोन लाखांची लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती एक लाख नियोजित ठिकाणी येऊन लाच स्वीकारच्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी पप्पूला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात एएसआय श्रीकृष्ण तालन, सुनील वर्हाडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, चंद्रकांत जनबंधू यांच्या पथकाने यशस्वी केली. पुढील तपास सुरू आहे.