डोंबिवली: कारवाई टाळण्यासाठी लाखो रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या दोन अधिका-यांना नोटीस बजावल्याच्या घटनेला 24 तासांचा कालावधी उलटला नसताना वर्क ऑर्डर काढण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागणा-या मनपा पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज आणि खाजगी प्लंबर रविंद्र डाये या दोघांना ठाणो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी डोंबिवली विभागीय कार्यालयात सापळा लावून अटक केली. एकिकडे विकासकामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे अधिकारी लाचेच्या प्रकरणात अटक झाल्याने पुन्हा एकदा केडीएमसीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
तक्रारदार हे प्लंबिंगची कामे करतात. एका व्यक्तीने त्यांचेकडे नवीन घराकरीता पिण्याच्या पाण्याचे नवीन नळजोडणी महापालिकेकडून मंजूर करून देण्याचे काम दिले होते. त्याप्रमाणो केडीएमसीचे फ आणि ग प्रभागातील पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता वाळंज यांनी तक्रारदार यांचेकडे 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 4 हजार रूपये देण्याचे निश्चित झाले. वाळंज यांनी संबंधित रककम खाजगी प्लंबर रविंद्र डायरे याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार डायरे यांनी रोकड स्विकारली असता दोघांनाही लाच घेतल्याप्रकरणी ठाणो लाचलुचपत विभागाचे पोलिस निरिक्षक विलास मते यांच्या पथकाने अटक केली.
मनपात लाचखोरीची प्रकरणो सातत्याने घडत आहेत त्यात सोमवारी लाखो रूपयांच्या लाच मागितल्याच्या आरोपाखाली दोघा अधिका-यांची आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी चौकशी लावली आहे. हा प्रकार ताजा असतानाच कनिष्ठ अभियंता लाचप्रकरणी अटक झाल्याने मनपा अधिकारी आणि कर्मचा-यांना लाच स्विकारण्याची लागलेली ‘लत’ काही केल्या संपत नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे.