अकोला : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, याचा फटका चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बसला आहे. पापळकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून अकोल्यातील अनेकांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती पोलिसांना देण्यात आली असून अकाउंट बंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांनी सुरू केला आहे.
अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले असून, या अकाउंटवरून मॅसेंजरद्वारे अनेकांना पैशांची मागणी केली जात आहे. हॅकरने माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे पुत्र अखिलेश हातवळणे यांना शुक्रवारी रात्री पापळकर यांच्या बनावट अकाऊंटवरून मॅसेज केला. तातडीने १२ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगून ऑनलाइन पैसे खात्यात वळते करण्याची विनंती केली. काही तरी गौडबंगाल असल्याचे लक्षात येताच अखिलेश हातवळणे यांनी याबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांना माहिती दिली. याबाबत सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली असून, पोलिस तपास करीत आहेत.