जळगाव : व्यवसायात नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यातून सुटका करण्यासाठी घरमालकाकडेच वेळोवेळी २० लाखाची खंडणी मागून धमकीच्या चिठ्ठ्या पाठविण्यासह कारही जाळण्यात आल्या. चित्रपटात शोभेल अशा या कहाणीचा तालुका पोलिसांनी आठ दिवस मेहनत घेऊन मंगळवारी त्याचा शेवट केला. या गुन्ह्याचा उलगडा करताना संशयितावर पिस्तूल रोखून सिनेस्टाईल अटक करण्यात आली. सुरेश रमेश लहासे (रा.पहूर, ता.जामनेर)व राजू समाधान कोळी (रा.गोद्री, ता.जामनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी शिवारातील लाठी नगरात हरिष वसंतराव वरुडकर (वय ४१) व आनंद युवराज पाटील या दोघांची कार (क्र.एम.एच.२० डी.जे.७३१६ व एम.एच.१९ सी.झेड.४४०४) जाळण्यात आल्याची घटना २८ जून रोजी रात्री घडली होती. वरुडकर हे खासगी नोकरी करतात तर पाटील यांचा हॉटेल व स्वीटमार्टचा व्यवसाय आहे. कार जाळल्याच्या दिवशीच दोघांच्या घराच्या आवारात पाकीटात एक धमकीची चिठ्ठी आढळून आली होती. या घटनेनंतर आणखीनही काही ठिकाणी अशाच प्रकारे चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. आनंद पाटील यांच्या मुळगावी हॉटेलमध्येही धमकी व खंडणीची चिठ्ठी मिळून आल्याने पोलीस अवाक् झाले होते. पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणाचा पर्दाफाश केला.