ठाणे- एका लॉटरी विक्रेत्याकडून जुगार अड्डा चालविण्यासाठी महिना दीड लाखांची मागणी करत १९ हजारांची खंडणी उकळणारा ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकचा पोलीस हवालदार राजेंद्र पाटीलविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा सोमवारी रात्री दाखल झाला. यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास मांजरेकर (४१, रा. राबोडी, ठाणे) यांचा ठाणे परिसरात लॉटरी विक्रीचा व्यवसाय आहे. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी युनिट एकचे पोलीस हवालदार पाटील यांनी त्यांना तसेच त्यांच्या मित्रंना जुगार खेळतांना पकडले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची अंगझडती घेऊन त्यांच्या खिशातील नऊ हजारांची रोकड काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा पाटील हे मांजरेकर यांच्याकडे गेले. ‘तुम्ही जुगार खेळा तुम्हाला कोणी हात लावणार नाही, फक्त आपल्याला रोज पाच हजार रुपये द्या’ असे त्यांनी सुनावले. त्यावर मांजरेकर यांनी जुगार खेळण्यालाच नकार दिला. त्यानंतर १६ ऑक्टोंबर रोजी मांजरेकर यांच्याकडे पाटील यांनी पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांचा मित्र दत्तू शेलार यांना मोटारसायकलीवर युनिट एकच्या कार्यालयात नेले. याच मित्रला सोडण्यासाठी ठाण्यातील रेमंड कंपनीतून त्यांनी दहा हजारांचे कपडे घेतले.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्येही असल्याचे मांजरेकर यांनी नौपाडा पोलिसांना सांगितले. पाटील यांनी ७ ते १६ ऑक्टोंबर या काळात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दीड लाखांच्या खंडणीची मागणी केली. तसेच नऊ हजारांची रोकड आणि कपडे घेण्यासाठी दहा हजारांची रोकड दिल्याची तक्रार २५ ऑक्टोंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.