उत्तर प्रदेशातील देवरिया येथे ४ सप्टेंबर रोजी शाळेतून परीक्षा देऊन परतणाऱ्या दोन विद्यार्थिनींची छेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी छेड काढणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हाफ एन्काऊंटरनंतर दोन आरोपींनी पकडलं आहे. दोघांच्या पायाला गोळी लागली आहे. तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. हृतिक यादव आणि धीरज पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
तरकुलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुली शुक्रवारी सायकलवरून परीक्षा देऊन आपल्या घरी परतत होत्या. याच दरम्यान, शाळेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर बाईकवरून चार जण येतात आणि मुलींची छेड काढतात. यावेळी मुली सायकलवरून खाली पडल्या. मुली आरडाओरडा करतात आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात.
मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर हे आरोपी पळून जातात. काहींनी तोंडाला फडका बांधला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यांना पकडण्यासाठी देवरिया पोलिसांची पाच पथके तैनात आहेत. ज्यामध्ये एसओजी टीमचाही समावेश आहे. रविवारी रात्री धीरज पटेल आणि हृतिक यादव हे दोन आरोपी सिरसिया रस्त्यावरून कुठेतरी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच, घेराबंदी दरम्यान, आरोपींनी गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल पोलिसांची गोळी दोघांच्या पायात लागली. आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, देवरियाच्या तरकुलवा पोलीस स्टेशन परिसरात ००५ ब्रदर्स नावाची मुलांची टोळी आहे, जी दररोज शाळकरी मुलींची छेड काढते. यापूर्वी ही टोळी रॉयल ब्रदर्स या नावावर होती. मात्र नंतर या टोळीने आपलं नाव बदललं.