पिंपरी : हाताची नस कापून गळफास घेऊन एका तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली. पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. १६) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. कर्ज तसेच व्यवसायात यश येत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दीपक रामचंद्र साबळे (वय ३१, रा. जयभवानी नगर, पिंपळे गुरव), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत दीपक हा सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी केतन साबळे यांचा लहान भाऊ होता. पिंपळे गुरव येथे एका इमारतीत साबळे कुटुंब वास्तव्यास आहेत. इमारतीच्या एका मजल्यावर दीपक हा त्याच्या आईवडिलांसह राहत होता. तर केतन साबळे हे त्यांची पत्नी आणि मुलांसोबत राहतात. आईवडील बाहेरगावी गेल्याने दीपक घरी एकटाच होता. त्यावेळी त्याने उजव्या हाताची नस कापून घराच्या छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेतला.
आईवडील सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी बराचवेळ आवाज देऊनही दीपक याने दरवाजा उघडला नाही. याबाबत त्याच्या आईवडिलांनी काही जणांना सांगितले. नागरिकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी दीपक याने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. याबाबत त्याचा भाऊ केतन साबळे यांना तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. केतन साबळे हे कर्तव्य बजावत होते. त्यांनी लगेचच घर गाठले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक याला सांगवी येथील जिल्हा सर्वेापचार रुग्णालयात हलविण्यात आले. डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयत दीपक हा अविवाहित होता. २०१२ पासून त्याने काही व्यवसाय केले. मात्र त्यात त्याला यश आले नाही. पिंपळे गुरव येथे त्याचे हाॅटेल होते. मात्र लाॅकडाऊनमुळे ते हाॅटेल बंद होते. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच कर्ज देखील झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. त्यातून नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.